गरोदरपणी हवी चपळता स्नायूंची

पूर्वी स्वयंपाक जेवण सारं काही बसून केले जात असे. त्यामुळे कमरेचा, पोटाचा, पायांचा सतत व्यायाम व्हायचा, सतत उठबस चालू असे. त्यावेळी गरोदरपण हे लहान म्हणजे प्रौढ वयात येत नसे. त्यामुळे स्नायू लवचिक असत. शिवाय घरात वडीलधारी मंडळी असत व नोकरीचे टेन्शन नसे. बाळंतपणाचा बाऊ वाटत नसे. सल्ला देणाऱ्या आजी घरात असत, पण आता मात्र सर्वच बदलले आहे. आताच्या परिस्थितीत गरोदर स्त्रीची शारीरिक व मानसिक घडण वेगळी असते. शहरात विभक्‍त कुटुंब असतात.

एकत्र कुटुंबासारखे मार्गदर्शन मिळत नाही. तसेच स्वतंत्र विचारांच्या स्त्रिया कोणाच्या सांगण्यावर विश्‍वासही ठेवत नाहीत. प्रत्येक गर्भवती स्त्रीने शरीरातील नवमासात होणाऱ्या या बदलाचा अभ्यासपूर्वक स्वीकार करायला हवा. शरीराला व मनाला बाळंतपणासाठी खंबीर तयार करायला हवे. सर्वस्वी आपल्या गायनिक किंवा प्रसूती तज्ज्ञ डॉक्‍टरच्याच सल्ल्याने वागू नये तर डाएटिस्ट, योगा तसेच अध्यात्म, व्यायाम या सर्वांचा सखोल विचार करायला हवा.

व्यायाम तसेच योगासनांसाठी शक्‍यतो सकाळची वेळ निवडणे केंव्हाही चांगले. जेवणानंतर निदान 3 तास तरी व्यायाम किंवा आसने करू नयेत. व्यायाम करण्यापूर्वी किंवा आसने करण्यापूर्वी तासभर आधी एक ग्लास दूध किंवा गरम पाणी प्यावे. मग योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शांत, स्वच्छ प्रसन्न जागेत, प्रसन्न चित्ताने व्यायाम व आसने करावीत, जमिनीवर मऊ जाडसरे सतरंजी घालावी.

छताकडे तोंड करून किंवा उताणे झोपून आपले शरीर सैलसर सोडावे. मग सावकाश चार वेळा दीर्घ श्‍वास घ्यावेत व आपल्या मनाशी म्हणावे, “या आसन व व्यायामामुळे माझे शरीर चांगले राहील व माझ्या बाळाला या जगात येण्यास काहीही त्रास होणार नाही. माझे बाळ आनंदाने शुभ समयी पदार्पण करेल.’

ज्या गरोदर स्त्रियांचा याआधी वारंवार गर्भपात झाला असेल तर त्यांनी आसने व व्यायाम करताना आपल्या प्रसूती तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा. “वार’ जर गर्भाच्या तोंडावर असेल तर आसन व व्यायाम करण्याआधी आपल्या डॉक्‍टरांचा सल्ला जरूर घ्यावा. आधुनिक काळात तिसऱ्या महिन्यानंतर लगेचच सोनोग्राफीचा सल्ला डॉक्‍टर देत असतात. म्हणूनच प्रसूतीपूर्वीचे व्यायाम करताना गरोदर स्त्रीने जागरूकता राखणे नितांत गरजेचे आहे.

सुजाता टिकेकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)