पिंपरी -गणरायाच्या स्वागतासाठी विविध प्रकारातील मोदक सध्या बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. मावा, मलई, गुलकंद, काजू, उकडीचे अशा विविध प्रकारातील मोदकांना गणेशभक्तांकडून सध्या पसंती मिळत आहे. तसेच, गणेशोत्सव काळात आवश्यकतेनुसार लागणाऱ्या मोदकांसाठी मिठाई विक्रेत्यांकडे मागणी नोंदवून ठेवण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात मोदक आवर्जून खरेदी केले जातात. गणेशभक्तांची मागणी लक्षात घेऊन विविध प्रकारातील मोदक मिठाई विक्रेत्यांनी तयार केले आहेत. घरगुती स्वरुपात बसविण्यात येणाऱ्या गणपतीसाठी विशेषत: मोदकांची मागणी असते.
गतवर्षी करोना प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला होता. त्यामुळे मोदकांना कमी मागणी मिळेल, अशी चिंता होती. मात्र, साधेपणाने गणेशोत्सव साजरा झाला असला तरी घरगुती स्वरुपातही मोठ्या प्रमाणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
त्यामुळे मोदकांना चांगली मागणी राहिली. अद्याप गणेशोत्सव सुरू झाला नसला तरीही मिठाई विक्रेत्यांनी मोदक बनविले आहेत. हे मोदक चवीनुसार आणि विविध फ्लेवरमध्ये बनविण्यात आले आहे. मावा, मलई, गुलकंद, काजू, उकडीचे, कॅडबरी, पिस्ता, अंजीर, मॅंगो, बटरस्कॉच आदी प्रकारातील हे मोदक आहेत. त्यांनाही उत्सव काळात चांगली मागणी मिळेल, अशी माहिती मिठाई विक्रेते रमेश कुमार यांनी दिली.