Pragati Gorade – शिरूर तालुक्यातील गोरडे दाम्पत्याची मुलगी प्रगती यंदा १०वीला होती. १०वीची परीक्षा सुरु होती, अखेरचा भूगोलाचा पेपर होणं बाकी होतं. मात्र शेवटच्या पेपरपुर्वीच प्रगतीवर काळाने झडप घातली. नुकताच १०वीचा निकाल जाहीर करण्यात आला. गोरडे कुटुंबीयांनी काळजावर दगड ठेवत प्रगतीचा निकाल पाहिला अन् डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू दाटून आले. एक पेपर बाकी असताना अपघातात जीव गमावलेल्या प्रगतीने १०वीत ७५. ४० टक्के गुण मिळवले.
प्रगती किसन गोरडे (रा. फलकेवाडी) कान्हूरच्या मेसाईच्या (ता. शिरुर) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १० वीच्या वर्गात शिकत होती. प्रगतीच्या आई वडिलांची परिस्थिती अत्यंत नाजूक असून शेतमजुरी करून जगणारे कुटुंब आहे. गोर्डे दाम्पत्याला तिनही मुलीचं आहेत. प्रगती त्यांची थोरली मुलगी होती.
कोणत्याही सोयी-सुविधा नसताना अभ्यास करून पास व्हायचं या निर्धाराने प्रगतीने अभ्यास केला. १०वीची परीक्षा सुरु झाली भूगोल विषयाचा पेपर अखेरचा होता. मात्र खेळताना दुर्दैवाने अपघात झाला आणि प्रगती मृत्युमुखी पडली.
काल दहावीचा निकाल लागला, प्रगती एक पेपर देऊ शकली नाही. मात्र तरीही केवळ इतिहासाच्या पेपरमध्ये मिळालेल्या गुणांवर प्रगती पास झाली. शाळेचा निकाल १००% लागला. प्रगतीचा निकाल तिच्या आईवडीलांना सांगताना प्राचार्य अनिल शिंदे यांनी आवर्जून सांगितले की, शाळेच्या शंभर टक्के निकालाच्या परंपरेचा लौकिक अबाधित ठेऊनच देवाघरी गेलेल्या प्रगतीला ७५. ४० टक्के इतके गुण मिळाले. सामाजिक शास्त्र विषयात एकूण ३८ गुण मिळाले कारण भूगोलाचा पेपर होण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला . या दुःखी वातावरणामुळे शिक्षकांसह ग्रामस्थांच्या देखील डोळ्यात अश्रू आले.