मुंबई – ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हाच आहे, असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. हिरेन हत्या प्रकरणी शर्माच्या जामीन अर्जाला विरोध करत एनआयएने एक प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये हिरेन यांच्या हत्येसाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने शर्माला 45 लाख रूपये दिल्याचाही दावा करण्यात आला आहे.
मागील वर्षी 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन आढळले. ते वाहन हिरेन यांच्या मालकीचे होते. हिरेन मागील वर्षी 5 मार्चला ठाण्यातील खाडीत मृतावस्थेत आढळले होते. त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे.
अंबानी कुटूंबीयांना घाबरवण्याच्या कटाचा भाग म्हणून त्यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवण्यात आले. त्या कटाची माहिती हिरेन यांना होती. त्यांच्याकडून चौकशीवेळी कटाची माहिती उघड केली जाण्याची भीती शर्मा आणि वाझे यांना वाटत होती. त्यातून हिरेन यांची हत्या करण्यात आली, असे एनआयएच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.