Pradip Sharma Information Marathi – २००६ मध्ये छोटा राजन टोळीचा सदस्य रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या याच्या कथित बनावट एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला. मुंबई पोलिस दलामध्ये ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ अशी ओळख असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना आज (मंगळवारी) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
वर्सोवा येथील नाना नानी पार्कजवळ लखनभैय्या याच्या कथित फेक एन्काऊंटर प्रकरणात, मुंबई न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर ६२ वर्षीय शर्मा यांना तब्बल ११ वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
११० हून अधिक गुंडांना यमसदनी धाडणाऱ्या, भल्या-भल्या गुंडांना धडकी भरवणाऱ्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याबद्दल काही फॅक्टस जाणून घेऊयात…
१. नावाजलेल्या १९८३ बॅचचे अधिकारी –
प्रदीप शर्मा हे विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, रवींद्र आंग्रे आणि विनायक सौदे यांच्यासोबतचे म्हणजेच १९८३ च्या प्रसिद्ध पोलिस अधिकाऱ्यांच्या बॅचचे आहेत. या पोलीस अधिकाऱ्यांना, दाऊद इब्राहिम कासकर, छोटा राजन, अरुण गवळी, अमर नाईक अशा कुख्यात गुंडांच्या दहशतीतून मुंबईची मुक्तता केल्याबद्दल ओळखलं जात.
२. विनोद मटकर ते सादिक कालिया भले भले गॅंगस्टर्स यमसदनी धाडले
१९९९ मध्ये, शर्मा व त्यांच्या टीमने, छोटा राजनचा हस्तक विनोद मतकर याचा ‘एन्काऊंटर’ केला होता. मतकरला दाऊद इब्राहिमला पाकिस्तानमध्ये जाऊन संपवण्यासाठी निवडण्यात आले होते. त्याच वर्षी मुंबईतील दादरमध्ये पोलिसांनी डी-कंपनीचा गुंड सादिक कालिया याचा ‘एन्काऊंटर’ करण्यात आला.
३. लष्कर-ए-तोयबा (LeT) दहशतवाद्यांचा खात्मा
२००३ मध्ये, शर्मा आणि त्यांच्या टीमने मुंबईच्या गोरेगाव परिसरात तीन संशयित लष्कर-ए-तोयबा (LeT) दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यापैकी अबू सुलतान आणि अबू अन्वर हे दोघे पाकिस्तानी नागरिक होते.
४. अंडरवर्ल्डसोबत नाव जोडलं
शर्मा यांचं नाव अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलं. त्यांना अंडरवर्ल्डशी कथित संबंध असल्याच्या आरोपाखाली ऑगस्ट २००८ मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर मे २००९ मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.
५. लखनभैया एन्काऊंटर प्रकरण
प्रदीप शर्मा यांना नोव्हेंबर २००६ मधील राजन टोळीचा सदस्य रामनारायण गुप्ता उर्फ लखनभैयाच्या कथित बनावट चकमक प्रकरणात 2010 सालामध्ये अटक करण्यात आली होती. चार वर्षांच्या तुरुंगवासानंतर 2013 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. २०१७ मध्ये, त्यांना पुन्हा पोलीस दलात घेण्यात आलं.ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
६. शिवसेनेत प्रवेश अन् विधानसभा निवडणूक लढवली…
शिवसेनेत (फुटींपूर्वीची) सामील होण्यासाठी त्यांनी जुलै २०१९ मध्ये राजीनामा दिला. मुंबईतील नालासोपारा येथून विधानसभा निवडणूक लढवली, ज्यात त्यांचा पराभव झाला.
७. पुन्हा अटक…
शर्मा यांना २०२१ मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अटक केली. यावेळी त्यांचे नाव अँटिलिया स्फोटक व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात समोर आले होते.