नारायणपूर – छत्तिसगढमध्ये बुधवारी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये चकमक झडली. त्यामध्ये डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचा (डीआरजी) एक जवान शहीद झाला. डीआरजी आणि आयटीबीपीच्या जवानांनी नारायणपूर जिल्ह्यातील जंगलात नक्षलींच्या विरोधात शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी जवानांना पाहून नक्षलींनी गोळीबार सुरू केला. त्या गोळीबाराला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये काही काळ चकमक झडली.
त्यामध्ये एका जवानाला वीरमरण आले. जवानांच्या माऱ्याला घाबरून नक्षलींनी जंगलाच्या घनदाट भागात पलायन केले. त्यांच्या शोधासाठी आणखी काही दिवस मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे. साधारणपणे उन्हाळ्यात नक्षलींच्या घातपाती कारवायांमध्ये वाढ होते. त्यामुळे उन्हाळ्यात सुरक्षा दले अधिक सतर्कता बाळगतात. तसेच, नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहिमाही तीव्र करतात.