प्रदीप शर्मा यांना शिवसेनेकडून नालासोपारातून उमेदवारी देण्याचे संकेत

मुंबई (प्रतिनिधी) – मुंबई पोलीस दलातील एकेकाळी “एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी अखेर हातात शिवबंधन बांधले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातात भगवा झेंडा देत शर्मा यांना शिवसेनेत अधिकृत प्रवेश दिला. नालासोपारा या जागेवरून प्रदीप शर्मा यांना शिवसेनेची उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

मुंबई पोलीस दलातील चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलातील सेवेचा आधीच राजीनामा दिला होता. नुकताच तो मंजूरही झाला. ते शिवसेनेत प्रवेश करणार हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यानुसार त्यांनी मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. शर्मा यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना, आधी त्यांची गन बोलायची आता त्यांचे मन बोलेल, अशी कोटीही उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले. अंडरर्वल्ड विरोधातील कारवाई करताना त्यांनी कायम आपली साथ दिली. मला सामाजिक कार्य करायची आवड आहे. त्यासाठी राजकारणासारखे मोठे व्यासपीठ हवे असल्याने आपण शिवसेनेत आल्याचे प्रदीप शर्मा म्हणाले.

दरम्यान, जागावाटपाबाबत मला आकड्यांत काही बोलायचे नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी माझ्यात आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तेव्हा जाहीर केले होते. त्यामुळे आता ज्या जागांच्या संख्येवरून बातम्या येत आहेत. त्यावरूनच मी म्हटले की शिवसेनेच्या जागा मुख्यमंत्रीच ठरवतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर पत्रकारांनी तुम्ही नाराज आहात का? असा प्रश्न विचारला असता तुम्हाला माझ्या चेह-याकडे पाहून तसे वाटते का? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.