आपण गेल्या भागात हे पाहिले की सक्षम पिढीसाठी महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे. आणि खऱ्या महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक सक्षमीकरण हा एक भाग आहे. याचाच आणखी एक भाग म्हणजे स्त्री पुरुष समानता. देशाचा सर्वोच्च राज्यघटनेनेसुध्दा स्त्री पुरुष समानतेचा दर्जा दिला आहे. राज्यघटनेच्या आर्टिकल 14 नुसार कायद्यासमोर सर्व समान असे आहेत. त्यानुसार कायदा स्त्री- पुरुष भेदभाव करत नाही. परंतु, समाजात, घरात, कामाच्या ठिकाणी, घरामध्ये, सभोवताली प्रत्येक ठिकाणी आजही स्त्री- पुरुष असमानता दिसते आहे. राज्य घटनेच्या आर्ट- 15 (1), आर्ट 16 (2) नुसार राज्यघटना कुठेही स्त्री पुरुष भेदभाव करत नाही. आर्ट 15 मध्ये म्हटलेले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्म, जात, वंश, परंपरा, लिंग यावरून समाजामध्ये भेदभाव होणार नाही. तसेच महिला व बालकांच्या हिताच्या दृष्टीने एखादा कायदा आणला जात असेल तर त्याला विरोध होणार नाही. कारण लहान मुले व महिला पिडीत समजले गेले आहेत.
स्त्री- पुरुष समानता घराघरांत येणे गरजेचे आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात, बाहेर कामाच्या ठिकाणी काम करत आहेत. परंतु, आजही घरातील कामांची वाटणी झालेली दिसत नाही. जेव्हा घरातील कामांचीसुद्धा वाटणी होईल, जेव्हा घरातील निर्णयामध्ये घरातील महिलेचे मत विचारात घेतले जाईल, जेव्हा महिलेला घरात मानाचे स्थान मिळेल, जेव्हा घरात मुलीच्या जन्माचे स्वागत आनंदात होईल, तेव्हा घराघरांत स्त्री- पुरुष समानतेचे बीज रोवले जाईल. आणि त्याचे रोपटे वाढेल. आज कामाच्या ठिकाणी समान काम, समान वेतन आहे. सगळीकडे समानता दिसते.
तरीही अनेक ठिकाणी महिलांना कमी लेखणे, ती महिला आहे, म्हणून तिला जमणार नाही, अशी असणारी मानसिकता, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसेच्या तक्रारी हेच सांगतात की, आजही कामाच्या ठिकाणीही स्त्री- पुरुष समानता रुजणे काळाची गरज आहे. स्त्री- पुरुष समानतेसाठी असणारा लढा हा पुरुषांविरुद्ध असा कधीच नाही अथवा नव्हता. हा लढा आहे तो पुरुषी मानसिकतेविरुद्ध. मग ही पुरुषी मानसिकता महिलांमध्येही असते. जेव्हा एखादी सासू गर्भवती सुनेचा मुलगाच हवा म्हणून छळ करते, जेव्हा एखादी महिला हुंड्यासाठी छळ करते, अशा वेळी तिथेही पुरुषी अहंकार व पुरुषप्रधान संस्कृती दिसते. स्त्री- पुरुष समानतेसाठी कार्य करणारे पुरूषही आहेत, हे विसरून चालणार नाही. तेव्हा स्त्री- पुरूष असमानतेची मानसिकता आपण संपवूया. यासाठी स्वतःपासून व स्वतःच्या घरापासून सुरुवात करूया.