कार्ला – श्री एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेला सोमवारपासून सुरवात झाली. यात्रेचा मुख्य दिवस असल्याने राज्याच्या विविध भागातून आलेल्या भक्तांमुळे परिसर गर्दीने फुलून गेला होता.
श्री एकविरा देवीच्या मंदिरात सकाळी देवस्थानचे विश्वस्त सागर देवकर यांच्या हस्ते देवीला अभिषेक करण्यात आला. सायंकाळी सात वाजता देवीची आरती व पालाखीचे विधिवत पुजन गुरव प्रतिनिधी, विश्वस्त व पुजारी प्रतिनिधी यांनी केले. त्यानंतर मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला सुरवात झाली. संपुर्ण परिसरात “एकविरा देवीच्या नावाने उदो… उदो…’ असा जयघोष ऐकू येत होता. सुमारे एक लाखांहून अधिक भाविकांनी श्री एकवीरा देवीच्या डोंगरावर गर्दी केली होती.
या यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या देवीची पालखीचे दर्शन घेण्यासाठी व पालखीची मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकणातून आलेल्या लाखो भाविक या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी आले होते. श्री एकवीरा देवी ही कोळी, आग्री, कुणबी, सोनार या समाजाची कुलदैवत असल्याने मुंबई, कोकण, रायगड भागातून अनेक पालख्या याठिकाणी आल्या होत्या.
यात्रेच्यावेळी मावळ तहसीलदार मधुसूधन बर्गे, लोणावळा पोलीस उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक, पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, मंडल अधिकारी माणिक साबळे, सरपंच अर्चना देवकर, उपसरपंच काजल पडवळ, विश्वस्त नवनाथ देशमुख, मारुती देशमुख, संजय गोविलकर, महेंद्र देशमुख, विकास पडवळ, सागर देवकर व्यवस्थापक मंगेश गायकवाड, पोलीस पाटील अनिल पडवळ यांनी एकवीरा देवीच्या यात्रेसाठी व देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. यात्रा काळात पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही.
पशूहत्या बंदी व दारूबंदीची अंमलबजावणी
यात्रेच्या तीन दिवसाच्या काळात कार्ला परिसरात तसेच श्री एकवीरा देवीच्या गडावर दारूबंदीचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत होती. श्री एकवीरा देवीच्या गडाकडे येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत होती. तसेच गडावर पशूहत्या होऊ नये यासाठीही प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेताना दिसत होते.