खडकवासला (विशाल भालेराव,प्रतिनिधी) – वेल्हे तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे रस्त्यावरील गावांची नावे चुकवली होती. फलकांच्या दुरुस्तीबाबतचे ऑनलाइन वृत्त दैनिक प्रभातमध्ये मंगळवार (दि.15) प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चुकीच्या नावांची दुरुस्ती केली आहे.
वेल्हे तालुक्याला जोडणारा “नसरापूर-वेल्हे’ हा मुख्य मार्ग आहे. स्वराज्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेले तोरणा व राजगड हे दोन महत्त्वाचे गडकिल्ले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वेल्हे तालुक्यातील या मार्गावरून लाखो पर्यटकांची रेलचेल सुरु असते. बांधकाम विभागाने रस्त्यावरील गावांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहून गावांची बदनामी केली होती.
नामफलकावरील चुकीचे नाव पाहून कित्येकवेळा वाईट वाटायचे. त्यावर चर्चाही व्हायची. परंतु बदल काही केल्या होत नव्हता. अखेर “प्रभातच्या’ दणक्याने प्रशासनाला जाग आली. नामफलकाच्या दुरुस्तीबाबत प्रभातने केलेल्या पाठपुराव्याबद्दल आम्ही वेल्हेकर ऋणी आहोत.
-मोहनराव धरपाळे, ग्रामस्थ, वांजळे.
दापोडे व वांजळे येथील चौकातील नामफलक तयार करताना शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष केले होते. वेल्हे पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर यांचे गाव “दापोडे’ असे असून त्याचेही नाव ‘दापडे’ असा उल्लेख केला होता. ते नाव दुरुस्त करण्यासाठी वारंवार मागणी होत असल्याने त्याला कानामात्र्याचे केवळ “ठिगळ’ लावले होते. मात्र, त्याच फलकावरील जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे यांच्या “वांजळे’ या गावाचे नाव “वांझरे’ असा लिहिण्यात आला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकारक्षेत्रात येणारी सर्व कामे उत्तम प्रकारे कशी होतील, याकडे विशेष लक्ष द्यावे. यापुढे अशा चुका होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. हे वृत्त प्रसिद्ध करून समस्येला वाचा फोडल्याबद्दल प्रभातने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
-शिवराज शेंडकर, ग्रामस्थ, दापोडे.
वेल्हे खुर्दऐवजी दिघे आळी असा उल्लेख केलेल्या बोर्डवरील चुकांची दुरुस्ती अभियंता संजय संकपाळ यांनी तातडीने करून घेतले. वेल्हे तालुक्यातील चुकीची नामफलके शोधून दुरुस्ती करण्याचे काम बांधकाम विभागाने युद्धपातळीवर सुरु केले आहे.