लोकसभेच्या वरिष्ठ गृहाची बैठक तहकूब करता येते का?
राष्ट्रपतींच्या अधिकारावर राज्यपरिषदेत चर्चा
नवी दिल्ली, ता. 24 : “”लोकसभेच्या वरिष्ठ सभागृहाची आबाळ होत असल्याची समजूत या सभागृहाच्या सभासदांची होत आहे. वरिष्ठ सभागृहाला जरूर तेवढ्या मानाने वागविण्याचे आश्वासन सभागृहाचे नेते श्री. विश्वास यांनी दिले आहें. भारतीय लोकसभेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची आखणी योग्य प्रकारे झाली असती, तर वरिष्ठ सभागृहाचें अधिवेशन ठरलेल्या दिवशी झाले असतें,” असे उद्गार वरिष्ठ सभागृहाचें अध्यक्ष डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आज काही सभासदांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना काढलें.
कायदेशीर मुद्दा..
डॉ. राधाकृष्णन म्हणाले, “”प्राप्त परिस्थितीत इष्ट तेच सरकार करीत आहे. लोकसभेच्या वरिष्ठ सभागृहाची एकदा बोलाविलेली सभा राष्ट्रपतींना तहकूब करता येते की नाही, हा अत्यंत विवाद्य मुद्दा आहे. त्यावर मला आजच निर्णय देता येणार नाही. पण वरिष्ठ सभागृहाची बैठक तहकूब करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी कायद्याचा सल्ला घेतला असावा.”
परकीय फौजा काढून घेण्याच्या चर्चेला कोरिया राजकीय परिषदेंत अग्रस्थान द्या
नवचीनचे पंतप्रधान लाय यांची नभोवाणी
टोकियो, ता. 24 : कोरियातील राजकीय परिषदेने सर्वप्रथम परकीय फौजा काढून घेण्याच्या प्रश्नावर चर्चा करावी अशी आमची मागणी आहें. या फौजात चिनी कम्युनिस्ट व राष्ट्रसंघ फौजांचा समावेश व्हावा असें नवचीनचे पंतप्रधान चाऊ-एन-लाय यांनी पेकिंग नभोवाणीवर भाषण करतांना निवेदन दिले.
अखंड कोरियाचा प्रश्न…
चाऊ-एन-लाय राजकीय परिषदेसंबंधी चिनी भूमिकेचे विवरण करीत होते. ते म्हणाले- शस्त्रसंधी कराराच्या 60व्या कलमानुसारच ही मागणी आहें. तसेंच याचवेळी अखंड कोरियाचा प्रश्न शांततेने हाताळण्यासंबंधी चर्चा व्हावी.
गोलमेज परिषद होऊ द्या…
राष्ट्रसंघ राजकीय समितीत रशियन प्रतिनिधीने या प्रकरणी घेतलेल्या पाठिंबा देऊन त्यांनी आमसभेनें नवचीन व उत्तर कोरियास सर्व निर्णय व राजकीय परिषदेची योजना कळवावी असे आवाहन केले. कोरिया राजकीय परिषद गोलमेज परिषदेसारखी असावी असे त्यांनी सुचविले.