आमदारांनी आपली संपत्ती जाहीर करावी
मुंबई, ता. 10 – प्रत्येक आमदाराने आपली संपत्ती जाहीर करावी, अशा आशयाचे एक बिनसरकारी विधेयक समाजवादी पक्षाच्या आमदार मृणाल गोरे यांनी आज विधानसभेत मांडले. या विधेयकात अशी मागणी करण्यात आली आहे की,
प्रत्येक आमदाराने आपल्या उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर तसेच त्याची आमदारकी मुदत संपेपर्यंत प्रत्येक वर्षामधील त्याची व त्याच्या नातलगाने बाळगलेली संपत्ती निवडणूक अधिकाऱ्याला सादर करावी.
वारसा रूढीने प्राप्त होणारे हक्क रद्द होणार
मुंबई – वांशिक तसेच रूढीमुळे मिळणारे हक्क रद्द करणारे विधेयक विधानसभेत मांडण्याचा शासनाचा विचार आहे. येत्या 15 दिवसांत एक समिती नेमण्यात येणार आहे, असे मंत्री प्रतिभा पाटील यांनी सांगितले.
बुद्धिजीवी समाजाला पुरोगामी दृष्टिकोन देणारे साहित्य हवे
पुणे – “लोकमान्य टिळक, रानडे, आगरकर, गोखले यांच्या काळात पुण्याला सबंध देशाचे जे पुढारीपण होते, ते नंतरच्या काळात टिकवता आले नाही. आता तरुण पिढीतून पुन्हा ते देशाला हालविणारे पुढारीपण निर्माण झाले पाहिजे’,
असे उद्गार गोदावरी परुळेकर यांनी काढले. जिवंत साहित्य निर्माण होण्यासाठी अनुभूतीची अत्यंत आवश्यकता असते. ज्या लोकांवर साहित्य लिहावयाचे, त्या लोकांचे जीवन साहित्यिकांनी जवळून पाहिले पाहिजे.
तांदूळ-आटा यापेक्षा सफरचंद-द्राक्षे स्वस्त!
कलकत्ता – कलकत्त्यात तांदूळ व आटा यापेक्षा सफरचंद व द्राक्षे स्वस्त मिळतात. तांदूळ 4 रुपये, आटा अडीच रुपये भाव मात्र, सफरचंद 2.40 रुपये तर द्राक्षे तीन रुपये किलो भावाने मिळतात.