पुणे – वाहतूक शाखेतील वादग्रस्त पोलीस निरीक्षकावर आणखी एक अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. संबंधीत पोलीस निरीक्षकाने एका इंटेरिअर डेकोरेटरला पिस्तूल दाखवून वाहतूक विभागाच्या कार्यालयातच मारहाण केली होती. यानंतरही संबंधीत पोलीस निरीक्षकाचे वादग्रस्त प्रकार थांबायला तयार नाहीत.
वाहतूक पोलीस उपायुक्तच त्यांना पाठिशी घालत असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. दरम्यान पुणे पोलीस गांभीर्याने दखल घेत नसल्याने पिडीत इंटेरियर डेकोरेटरने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे.
पोलीस निरीक्षक राजेश पुराणीक असे वादग्रस्त पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्या विरुध्द समर्थ पोलीस ठाण्यात मारहाण व शिवीगाळ केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादींचा मुलगा किराणा माल आणण्यासाठी दुचाकी घेऊन बाजारात गेला होता. यावेळी त्याची दुचाकी समर्थ वाहतूक विभागातील टेम्पोने उचलली.
ही दुचाकी आणण्यासाठी फिर्यादी व त्यांचा मुलगा समर्थ वाहतूक विभागात गेला होता. यावेळी पुराणिक यांनी त्यांना तुमच्या मुलाने मला शिव्या दिल्या असे म्हणत धक्का-बुक्की करत शिवीगाळ केली. यानंतर त्यांच्या मुलाचा मोबाईल फेकला. यामध्ये मोबाईलची स्क्रिन फुटून त्याचे नुकसान झाले.
यापुर्वी पुराणीक यांनी घरातील इंटेरिअर डेकोरेशनचे काम व्यवस्थित केले नाही म्हणून कार्तिक ओझा नावाच्या इंटेरिअर डेकोरेटरला मारहाण केली होती. त्याच्याकडे दिलेले पैसे परत मागण्यात आले. यानंतर त्याच्या कुटूंबीयांचाही मानसिक छळ करण्यात आला.
याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.दिल्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कुटे करत आहेत.