मुंबई – आर्यन खान ड्रग प्रकरणातील मुख्य साक्षिदार प्रभाकर साईल यांचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. साईल यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा आर्यन खान प्रकरण चर्चेत आले आहे. दरम्यान साईल यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता राष्ट्रवादीकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी सुद्धा राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी ही शक्यता वर्तवली आहे.
महेश तपासे म्हणाले, कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने फर्जीवाडा करुन केलेल्या कारवाईतील एनसीबीचा पंच आणि एनसीबीचा फर्जीवाडा प्रतिज्ञापत्राद्वारे उघड करणारा प्रभाकर साईल याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आहे मात्र या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असून राज्यसरकारने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी. अशी मागणी तपासे यांनी केली आहे.
कोण आहे प्रभाकर साईल?
ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. या किरण गोसावीचा खासगी अंगरक्षक प्रभाकर साईल होता. एवढेच नाही तर प्रभाकर साईल एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरही आरोप केले होते. 25 करोड रुपये लाच मागितल्याचा आरोप प्रभाकर साईल यांनी वानखेडे यांच्यावर केला होता.