नेपाळच्या सत्तारुढ पक्षामध्ये फूट पडण्याची शक्‍यता

काठमांडू – नेपाळमधील सत्तारुढ नेपाळ कम्युनिस्ट पार्टीमध्ये फूट पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पक्षाच्या सेंट्रल कमिटीच्या काही गटांच्या बैठका व्हायला सुरुवात झाल्यानंतर ही शक्‍यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी आपला गट सक्षम करण्यासाठी 1,199 सदस्यांची नवीन कमिटी स्थापन केली आहे.

पक्षाचे अध्यक्षपद ओली यांच्याकडे विभागून देण्यात आले आहे. मात्र पक्षाच्या सेंट्रल कमिटीतील त्यांच्याच निकटवर्तीयांबरोबर पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या बुलावतार येथे झालेल्या बैठकीनंतर ओली यांनी स्वतःची स्वतंत्र कमिटी स्थापन करण्याची घोषणा केली. नव्याने स्थापन झालेल्या कमिटीतील सदस्यांनी पंतप्रधांच्याच उपस्थितीत कमिटीच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.

नारायण काजी श्रेष्ठ यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. परराष्ट्रमंत्री आणि पक्षाचे स्थायी समिती सदस्य प्रदीप ज्ञवाली यांची पक्षाचे नवे प्रवक्‍ते म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती केंद्रीय समितीचे सदस्य बिनोद श्रेष्ठ यांनी दिली.

नव्याने नियुक्‍त करण्यात आलेल्या कमिटीमध्ये पूर्वीच्या 446 सदस्यांची संख्या 556 सदस्यांनी वाढवण्यात आली आहे. कमिटीमध्ये आणखी काही सदस्यांची संख्या वाढवल्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही, असे ओली यांनी म्हटले आहे.

पुढच्या वर्षी 18 ते 23 नोव्हेंबर रोजी पक्षाचे सर्वसाधारण अधिवेशन घेण्याचा प्रस्तावही ओली यांनी या बैठकीमध्ये ठेवला. यापूर्वी पक्षाचे अधिवेशन 7 ते 12 एप्रिल 2021 रोजी आयोजित करण्याचे ठरले होते.

दुसरीकडे विरोधी गटाने आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पुष्प कमल दहाल प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मध्यवर्ती कमिटीच्या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान माधवकुमार नेपाळ आणि झलानाथ खनाल आणि माजी कृषिमंत्री घनश्‍याम भुशाल आदी वरिष्ठ नेते उपस्थिते होते. मात्र नवीन पक्षाची स्थापना झाल्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

पक्षांतर्गत सत्तास्पर्धेमुळे ओली यांनी अध्यक्षा बिद्या देवी भांडारी यांची भेट घेऊन संसद विसर्जित करण्याची शिफारस केली होती. तेंव्हापासून नेपाळमधील राजकीय हालचालींना वेग आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.