महाराष्ट्र बॅंकेकडून आयातदार-निर्यातदार बैठकीचे आयोजन

राष्ट्रीय उत्पन्न वाढीत निर्यातदारांची भुमिका महत्वाची ठरणार

पुणे – देशात सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक ऑफ महाराष्ट्रने पुणे येथे 21 डिसेंबर 2020 रोजी आयात-निर्यातदार बैठक आयोजित केली होती. पुण्यातील प्रख्यात व्यावसायिकांसमवेत 80 पेक्षा अधिक आयातदार व निर्यातदारांनी या बैठकीत भाग घेतला.

बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक हेंमत टम्टा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. प्रशांत खटावकर, प्रमुख वित्त अधिकारी आणि ट्रेझरी व आंतरराष्ट्रीय विभागाचे महाप्रबंधक तसेच व्ही. पी. श्रीवास्तव, महाप्रबंधक व अंचल प्रबंधक पुणे शहर हेही उपस्थित होते.

हेमंत टम्टा यांनी सांगितले की, आयात-निर्यातदारांसाठी व्यवसाय प्रक्रिया सुलभीकरणाच्या हेतूने बॅंकेने तंत्रज्ञानाच्या आघाडीवर अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवसायामधील ग्राहकांसाठी बॅंकेच्या योजना आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायात भविष्यातील बदल याचीही टम्टा यांनी माहीती करून दिली.

रिटेल कर्ज क्षेत्रात बॅंक ऑफ महाराष्ट्रचे सेवाशुल्क स्पर्धात्मक असून या क्षेत्रात सर्वोत्तम आहे याचा टम्टा यांनी विशेष उल्लेख केला. ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी ह्याकरीता बॅंकेने लक्ष केंद्रित केले आहे. तरुण पिढीने बॅंक ऑफ महाराष्ट्रबरोबर येऊन बॅंकेच्या विविध सेवा, अनिवासी भारतीयांसाठीच्या सेवा यांचा अनुभव घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. लघुउद्योजकांसहित सर्व व्यावसायिकांना बॅंकेकडून सर्वप्रकारचा पाठिंबा मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले.

प्रशांत खटावकर आणि विजय श्रीवास्तव यांनी देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न वृद्धीमध्ये निर्यात व्यावसायिकांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. लॉकडाऊननंतर निर्यात व्यवसायांनी वेगाने परत काम चालू केले आणि जागतिक बाजारपेठेच्या आधाराने भारताचा निर्यात व्यवसाय वाढविण्याचे नवीन मार्ग आणि संधी उपलब्ध झाल्या याचा विशेष उल्लेख केला. या वेळी बॅंकेच्या विविध उत्पादन आणि सेवांची माहिती देण्यात आली. प्रश्नोत्तर सत्रामध्ये ग्राहकांनी बॅंकेच्या सेवा आणि पाठिंबा याबद्दल प्रशंसा केली आणि काही सूचना देखील केल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.