मांडवगण फराटा -शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा येथे आठ दिवसांपूर्वी दिल्ली येथून आलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे, मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली. मांडवगण फराटा हे परिसरातील मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. त्यामुळे रुग्ण सापडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
मांडवगण फराटा येथे (दि. 19) दिल्ली येथे यूपीएससीचा अभ्यास करणारा एक तरुण हा त्याच्या घरी आला होता. मांडवगण फराटा येथे तरुणाला डॉ. सातपुते-इसवे व सरपंच शिवाजी कदम यांनी होम क्वारंटाइन केले होते. हा तरुण दिल्ली येथून रेल्वेतून आला होता.
रेल्वेत त्याच्यासोबत प्रवास करत असलेल्या कोल्हापूर येथील त्याच्या मित्राचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या तरुणाची तपासणी करण्यात आली. तरुणास ताप व थोडा घसा दुखत असल्याने नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यात त्याची तपासणी केल्यानंतर त्याला संसर्गाची लक्षणे दिसून आली. पुढील उपचारासाठी त्याला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.