- वाहन धडकल्याने दोन ठिकाणी बॅरिकेटस तुटले
पिंपरी – आळंदी-पुणे बीआरटी मार्गावर बससेवा अद्याप सुरु झालेली नाही. मात्र, त्यापूर्वीच मार्गावरील बॅरिकेटसला दोन ठिकाणी वाहनाची धडक बसल्याने हे बॅरिकेटस तुटले आहेत. लॉकडाऊनच्या काळात हे अपघात झाले असून, त्यानंतरही हे बॅरिकेटस तुटलेल्या अवस्थेतच आहेत.
आळंदी-पंढरपूर हा पालखी मार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. साठ मीटर रुंद असलेल्या या मार्गावर बीआरटी मार्गदेखील तयार करण्यात आला आहे. मार्च 2019 मध्ये या मार्गातून बस धावण्याचे नियोजन करण्यात आले होते. या अंतरासाठी आतापर्यंत महापालिकेने 11 कोटीपेक्षा अधिक रक्कम मोजली आहे.
दिघी ते बोपखेल या दोन किलोमीटरचा रस्ता लष्करी हद्द व टाटा कम्युनिकेशनलगत असल्याने याठिकाणचे काम रखडले आहे. तर दिघी गावठाणातील रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने याठिकाणी बीआरटी मार्ग वगळण्यात आला आहे. तर बी यू भंडारी स्कायलाइनपासून थेट आळंदीजवळच्या महापालिका हद्दीतील काळे कॉलनीपर्यंत बीआरटी मार्ग उभारण्यात आला आहे. तर पुणे महापालिका हद्दीत साठे बिस्कीट बसथांब्यापासून बीआरटी मार्गात संचलन केले जात आहे.
सध्या काळे कॉलनी ते दिघी या मार्गावरील बीआरटी मार्गावरील वडमुखवाडी (चिंच बसथांबा) व गणपती मंदिराजवळील बीआरटी मार्गाचे काम प्रलंबित आहे.
बस थांबे बनले फिरस्त्यांचा निवारा
या मार्गावरील बहुतांशी सर्व बसथांब्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे या थांब्यांमध्ये तांत्रिक बाबी न बसविल्याने बीआरटी मार्गावर संचलन होत नाही. त्यामुळे हे थांबे प्रवाशांशिवाय धूळ खात पडून आहेत. काही बस थांब्यांमध्ये फिरस्त्यांनी अतिक्रमण केले आहे.
बीआरटी मार्गिकेत फोटो शूट, दुचाकी प्रशिक्षण
सद्यस्थितीत बीआरटी मार्ग व बसथांबे धूळखात पडून असले, तरी स्थानिक रहिवाशांकडून मात्र त्याचा वापर विविध कारणांसाठी केला जात आहे. सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठीचे अनेक फोटो व व्हिडीओ शूटींग याठिकाणी केली जात आहे. तर अनेक जण कुटुंबातील सदस्यांना या मार्गिकेत दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देताना दिसत आहेत.
या नऊ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने वाहनांची गती अधिक असते. परिणामी वेगावर नियंत्रण राहत नसल्याने हे अपघात होत आहेत. त्यामुळे बीआरटीचे नुकसान होत आहे. ही बाब टाळण्यासाठी चालकांनी वाहने नियंत्रित वेगात चालवावीत.
विजय भोजने
प्रवक्ता, बीआरटीएस, पिंपरी-चिंचवड महापालिका