प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 16 -पुणे-सोलापूर महामार्गावरील सोलापूर बाजार येथील पुलगेट बसस्थानक ते गोळीबार मैदान, धोबीघाट चौकापर्यंत रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या अर्धा किमीच्या पट्ट्यात किमान एक हजार खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांचा वेग प्रतितास अवघ्या एक कि.मी.वर येत आहे. त्यातच पाऊस सुरू असल्यास हा वेग आणखी कमी करावा लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. गोळीबार मैदान तसेच धोबीघाट येथील सिग्नल बंद असल्यास वाहन चालकांना वाहने बंद करूनच तासन्ंतास थांबावे लागते. वाहतूक पोलिसांनी याकामी लक्ष द्यावे, पालिका प्रशासनाने खेड्ड् बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर येथून पुणे शहरात प्रवेश होत असतानाच वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. स्वारगेटपर्यंत येत असताना अनेक ठिकाणी खेड्ड् पडल्याने हा खरोखरच महामार्ग आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हडपसर येथील मगरपट्टा दुहेरी उड्डाणपुलाखाली, किर्लोस्कर पुलावरून उतरत असतान एसआरपी चौक, मरीआई चौक येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हा खडतर टप्पा पार केल्यानंतर पुलगेट ते गोळीबार मैदान-धोबीघाट चौक वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
येथे रस्त्याचा एक कि.मी. टप्पा पूर्णपणे उखडला आहे, त्यातच या दोन्ही चौकात वाहनचालक विरूद्ध दिशेने “नो एंट्री’ असताना कोंढव्याकडे वळत असल्यानेही चौकात वाहतूक कोंडी होत आहे.
पुणे कॅन्टोमेन्ट बोर्डाचे दुर्लक्ष…
पुणे-सोलापूर महामार्गावरील गोळीबार-धोबीघाट चौक टप्पा पुणे कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या हद्दीत येतो. या चौकात गॅसवाहिनीच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला. गॅसवाहिनी टाकल्यानंतर रस्ता बुजविण्याचे काम संबंधीत कंपनीचे असताना एक आठवड्यापासून तो तसाच ठेवण्यात आला आहे. यामुळे प्रचंड मोठा खड्डा येथे झाल्याने वाहतूक संथगतीने तर कधी कोंडी होत आहे. या ठिकाणी खड्डे बुजविणे अपेक्षित असताना पुणे कॅन्टोमेन्ट बोर्ड प्रशासनाकडूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बोर्डाच्या मुख्य कार्यालयासमोरच रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असतानाही दुरुस्तीकडे बोर्ड प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न अवघड झाला आहे. याबाबत पुणे कॅन्टोमेन्ट बोर्ड प्रशासनाशी संपर्क साधला असता कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.