पुणे – शाळा, महाविद्यालये किंवा इतर सरकारी इमारतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जात होती. आता मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यानुसार पुणे शहर तसेच काही ग्रामीण भागातील 36 मोठ्या सोसायट्यांमध्ये हे केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
मतदानाच्या दिवशी काही मतदारांचा अनुत्साह दिसून येतो. विशेषत: सुशिक्षित मतदार मतदानाच्या दिवशी बाहेर पडण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचे आतापर्यंत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून दिसून आले आहे. विशेषत: पुणे, मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या असून अशा इमारतींच्या सोसायट्यांमध्ये हजारोंच्या प्रमाणात लोकसंख्या असते. त्यातच दैनंदिन कामाच्या वेळा, मतदानाबद्दल अनुत्सूकता, मतदान केंद्र लांब, तेथील रांग अशा प्रकारांमुळे मतदारांमध्ये मतदानाबद्दल अनुत्सूकता असल्याचे दिसून येते. त्यापार्श्वभूमीवर ही सुविधा निर्माण केली जात आहे.
येथे असेल सुविधा
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदा ज्या ठिकाणी एक हजारापेक्षा जास्त सदस्य असणाऱ्या सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यानुसार कोथरूड परिसरातील सर्वाधिक सोसायट्यांचा समावेश असून वडगाव शेरी, माण, हिंजवडी, पिंपरी, चिंचवड, अशा विविध ठिकाणच्या 36 सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र सुविधा देण्यात आली आहे. या ठिकाणच्या सोसायट्यांमधील सदस्यांना जागेवर मतदान करता येणार आहे.
दरम्यान, अशा विविध उपक्रमांमुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा निवडणूक आयोगाकडून व्यक्त केली जात आहे. शिवाय, तरुणाईमध्ये जागृती, सोशल मीडिया याद्वारे देखील मतदानाचे महत्त्व निवडणूक आयोगाकडून पटवून दिले जात आहे. त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.