चंदीगड – पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांनी स्वतःच आज ही माहिती दिली. ते म्हणाले की, आपल्या राजकीय पक्षाचे नाव रजिस्टर करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे.
पक्षासाठी स्वतंत्र निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठीही आम्ही अर्ज केला आहे, असे त्यांनी सांगितले. ते झाल्यानंतर आपण रितसर पक्ष स्थापनेची घोषणा करू, असे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाशी युती करणार काय, असे विचारता ते म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होऊन ते आंदोलन संपले तर आम्ही भाजपशी युती करण्याचा विचार करू. माझ्या राज्यातील जनतेचे भविष्य सुरक्षित केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.