राजकीय पक्ष सज्ज ; जिल्हाध्यक्षांना आदेशाची प्रतीक्षा

आघाडीकडून दहा तर भाजप व सेनेकडून स्वतंत्र बारा जागांचा दावा

नगर  – विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. पक्ष कार्यालयांसह नेत्यांचे संपर्क कार्यालयांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली असून, मतदार याद्यांचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र समोर आले आहे.

राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी शिवसेना व भाजपमधील युतीचे घोडे अद्यापही गंगेत न्हाले नसल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती दिसून येत आहे. आजच्या घडीला सर्वच पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचे लक्ष नेत्यांच्या आदेशाकडे लागले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, राजकीय मोर्चेबांधणीसाठी विविध पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सरसावले आहेत.आचारसंहिता लागू झाल्यामुळे उमेदवारी अर्ज सादर करण्याची तारीख समजताच भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या प्रचार सुरू केल्याचे दिसून येत आहे.कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते, पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

आघाडी व युतीमध्ये हा घोळ सुरू आहे. अर्थात आघाडीत जागा वाटपाचा फारसा तिढा नाही. पण युतीमध्ये मात्र जागा वाटप हे नेत्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे. भाजपकडे कर्जत-जामखेड, शेवगाव- पाथर्डी, नेवासे, कोपरगाव, राहुरी याच पाच मतदारसंघासह श्रीगोंदा, शिर्डी व अकोले हे दोन असे सात मतदारसंघ राहणार असले तरी श्रीगोंदा, कोपरगाव, राहुरी व नेवासे या तीन मतदारसंघात बदल करण्याचा आग्रह होत आहे.

शिवसेनेकडे पारनेर, नगर शहर, संगमनेर, श्रीरामपूर हे चारच मतदारसंघ वाट्याला येत आहे. त्यात शिवसेनेकडून नेवासे, श्रीगोंदा व राहुरी हे तीन मतदारसंघाची मागणी होत आहे. त्यामुळे जागाचा तिढा अद्यापही मिटलेला नाही. आघाडीत कॉंग्रेसने संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, श्रीगोंदा व कर्जत – जामखेड या पाच जागावर दावा केला आहे. त्यात कर्जत-जामखेडची जागा राष्ट्रवादीला सोडल्या जाणार आहे. श्रीगोंदा मात्र एखाद्यावेळी कॉंग्रेसकडे जाण्याची शक्‍यता आहे. बाकी उर्वरित सर्व मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे.

कोणी कोठे केले असले तरी कॉंग्रेस कार्यकर्ते मात्र आहे तिथेच आहे. विखे भाजपमध्ये गेल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना पक्षात काम करण्याची संधी मिळाली असून आज प्रत्येक तालुक्‍यात संघटना उभारणीचे काम जोरात सुरू आहे. कॉंग्रेसने पाच जागांची मागणी केली आहे. त्यात कर्जत-जामखेड व श्रीगोंदा या दोन जागा पक्षाला मिळाव्यात. यासाठी प्रयत्न होत आहे. कॉंग्रेस किमान चार जागा तर जिंकणार
बाळासाहेब सांळुके, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष

पक्षश्रेष्ठी युतीबाबत जो काय निर्णय घेतली तो मान्य राहणार आहे. युती झाली नाही तर शिवसेना बाराही मतदारसंघात उमेदवार उभे करू शकेल. यापूर्वी उमेदवार मिळविणे हे शिवसेनेच्या दृष्टीने कसरत होती. पण आता ते दिवस गेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला उमेदवार मिळणे अवघड आहे. पण शिवसेनेला सर्वच मतदारसंघात उमेदवार मिळतील. युतीमध्ये राहुरी, श्रीगोंदा व कोपरगाव या तीन मतदारसंघाची मागणी शिवसेनेने केली आहे.
प्रा.शशिकांत गाडे, शिवसेना, जिल्हाप्रमुख.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. बुथ रचना मजबूत असून, निवडणूक संचालन समिती फार पूर्वीच कामाला लागली आहे. सध्या पक्ष बाराही मतदारसंघात काम करीत असून युतीबाबत राज्यपातळीवर निर्णय होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा चालू असून येत्या दोन ते तीन दिवसात युतीचा निर्णय होणे अपेक्षित आहे. युतीचा निर्णय झाला नाही तर भाजप जिल्ह्यात बाराही मतदारसंघात सक्षम उमेदवार देईल. कार्यकर्ता, बुथ प्रमुख, पक्ष प्रमुख आमची शक्तीस्थळे असून, 25 सप्टेंबरपासून मुख्यमंत्र्यांचे पत्र घरा-घरांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहे.
प्रा.भानुदास बेरड भाजप जिल्हाध्यक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.