पणजी- महाराष्ट्राच्या राजकारणात दोन आठवड्यांपूर्वी मोठा भूकंप आला. शिवसेना आणि अपक्ष अशा 50 आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर आता गोव्यातही मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्र्यासह 10 आमदार भाजपात विधिमंडळ गटात विलीनीकरण करण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप श्रेष्ठींकडूनही यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येत आहे.
गोव्यात कॉंग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून दहा आमदारांचा गट लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवार 11 जुलैपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि इतर कॉंग्रेस आमदार लवकरच भाजपवासी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या हालचालींचा शनिवारी सुगावा लागल्यानंतर कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव यांनी तातडीने याची दखल घेतली. त्यांनी आमदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह अन्य 9 कॉंग्रेस आमदार असे एकूण दहा जणांचा गट भाजपात विलीन करण्याबाबत ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी 10 जुलै 2019 रोजी 10 कॉंग्रेस आमदारांनी बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपात प्रवेश केला होता. सध्या कॉंग्रेसचे 11 आमदार गोवा विधानसभेत आहेत. त्यातील 8 आमदार फुटल्यावर आमदारांना निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज नाही.