जिनिव्हा – महिला हक्कांसंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाने राजकीय घोषणापत्र स्वीकारले आहे. महिलांच्या अधिकारांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांनी एक नवीन घोषणा केली आहे.
महिलांच्या सध्याच्या अधिकाराचे संरक्षण करणे अभिप्रेत आहे असे या घोषणेत म्हटले असले तरी स्त्री पुरुष समानतेच्या दिशेने कोणत्याही नव्या प्रस्तावांचा यात समावेश केलेला नाही. महिलांच्या सामाजिक स्थिती बाबतच्या आयोगाच्या 64 व्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
स्त्रियांच्या बाबतीत वर्षानुवर्षे होणार भेदभाव, समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक व्यवस्था आणि महिलांना कायम हीन मानण्याच्या परंपरेमुळे आपल्या अर्थव्यवस्थेत तसेच राजकीय जीवनात, महिलांना नेहमीच गौण लेखले गेले त्यामुळे स्त्री पुरुष असमानता वाढीला लागली असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरस यांनी या बैठकीदरम्यान बोलताना सांगितले.
करोना विषाणू संसर्गाच्या पाश्वभूमीवर या बैठकीचा कालावधी कमी करण्यात आला होता, तसेच सदस्य राष्ट्रांनी आपल्या प्रतिनिधींना या बैठकीसाठी न्यूयॉर्कला पाठवू नये, असे आवाहन गुटेरस यांनी केले होते.