नवी दिल्ली – रंगांची उधळण असलेला होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी जणतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करोना विषाणुच्या संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यंदा राष्ट्रपती भवनात पारंपरिक होळी मिलन कार्यक्रम झाला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा कोरोना साथीमुळे कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी आणि रंगोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वांत मोठ्या शिमगोत्सवातला होळीपौर्णिमेचा कालचा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला.
होळीच्या ठिकाणी असलेल्या सहाणेवर ग्रामदेवतेच्या चांदीचा मुखवटा घातलेल्या मूर्ती असलेल्या पालख्या वाजत गाजत आणण्यात आल्या. त्याठिकाणी पालखी नाचवण्याचा कार्यक्रम पार पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. काल रात्री ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीनं होलीकादहन करण्यात आले, तर आज धुळवडीचा उत्सव सुद्धा उत्साहात साजरा होतो. शिमग्याची सोंग घेऊन दारोदारी शबय मागण्यासाठी जाणं ही इथली एक परंपरा. पापरंपरिक राधानृत्यानी शिमग्याचा सण साजरा होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातला प्रसिद्ध काठी संस्थानचा राजवाडी होळी उत्सव आज पहाटे हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत संप्पन झाला. या होळीसाठी लागणारा बांबु खास गुजरातच्या जंगालातुन आणला जातो.
नांदेड शहरात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा परिसरात पर्यावरण पुरक होळी दहन करण्यात आलं. या होळीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात महिला बाल कल्याण विभागाच्या वतीनं सुरू असलेल्या पोषण पंधरवड्या अंतर्गत कुपोषणाची होळी करण्यात आली.