काबुल- अफगाणिस्तानचे अध्यक्ष म्हणून अशर्रफ घनी यांनी काल दुसऱ्यांदा शपथ घेतली. अध्यक्ष्यांच्या राजवाड्यामध्ये झालेल्या समारंभामध्ये अशर्रफ घनी यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली.
या समारंभाला अमेरिकेचे समन्वयक झालमाय खलिलझाद, अफगाणिस्तानसाठीचे अमेरिकेचे प्रभारी रोज विल्सन आणि अमेरिका, नाटो सैन्याचे कमांडर जनरल स्कॉट मिलर, युरोपियन संघातील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, जर्मनी आणि नॉर्वे या देशांचे राजदूतही उपस्थित होते. अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये विजयी झाल्याचा दावा करणारे माजी उपाध्यक्ष अब्दुल्ला अब्दुल्ला यांनीही सोमवारी स्वतःला अध्यक्ष म्हणून घोषित केले आणि शपथविधीही करवून घेतला.
घनी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या निवडणूकीनंतर जवळपास 5 महिन्यांनंतर या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकांमध्ये तालिबानने अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता. निवडणूकीच्या काळात अनेक ठिकाणी तालिबान्यांनी हल्ले केले होते.
निवडणूकीमध्ये अब्दुल्ला अब्दुल्ला यांना 39 टक्के मते मिळाली होती. तर घनी यांना अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यापेक्षा फार थोडे मताधिक्य मिळाल्याचे जाहीर करण्यात आले होते.