गोलाघाट ( Police training camp clash ) – आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील लचित बोरफुकन पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या मणिपूर पोलिस कॅडेट्सच्या दोन गटांमध्ये हाणामारी होऊन किमान सात प्रशिक्षणार्थी जखमी झाले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
देरगाव येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीमध्ये शनिवारी रात्री जेवणाच्या वेळी एका प्रशिक्षणार्थीने स्थानिक बाजारातून दारू आणली होती, त्यानंतर त्याने आणि अन्य एका प्रशिक्षणार्थीने एकमेकांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर दोन गटांत हाणामारी सुरू झाली.
लवकरच या हाणामारीचे रूपांतर दोन गटांमधील संघर्षात झाले. मारामारीमुळे मणिपूरचे सात प्रशिक्षणार्थी जखमी झाले. तीन जखमींना उपचारासाठी जोरहाट वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर चार जखमींना स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
रात्रीच्या जेवणाच्या वाटपावरून प्रशिक्षणार्थींमध्ये हाणामारी झाल्याचा दावा केंद्र संचालकांनी केला आहे. तसेच घटनेवर पांघरुण घालताना केंद्र् संचालक म्हणाले की, आता हे प्रकरण मिटले आहे. मणिपूर पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यातून वरिष्ठ आयपीएस (भारतीय पोलिस सेवा) अधिकारी तैनात केले आहेत. ( Police training camp clash )
प्रकरणावर लक्ष ठेवले जात आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे, असे मणिपूर पोलिसांनी सांगितले आहे. मात्र या संघर्षाला मणिपूरमधील संघर्षाचे संदर्भ आहेत का, ते तपासले जात आहे. ( Police training camp clash )