सातारा – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही डॉमिनोझ पिझ्झा हे दुकान उघडे ठेवल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हवालदार राहुल खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देशात करोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता बाकी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
तरीही “डॉमिनोझ’चा व्यवस्थापक प्रशांत पाणगुडे (रा. रविवारपेठ, सातारा), सचिन मोरे (रा. स्वराज नगर,सातारा), गणेश बावलेकर (रा. पंताचा गोट, सातारा), सुरेश ढेबे (रा. राजवाडा बसस्थानकाजवळ, सातारा), मंगेश मोहिते (रा. शनिवार पेठ, सातारा), स्वाती वाटांबळे (रा. बारावकरनगर, सातारा) यांनी पोवई नाका परिसरात असलेले डॉमिनोझ पिझ्झा दुकान उघडले होते.
याबाबत पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सातारा शहर पोलिसांनी डॉमिनोझ पिझ्झा दुकान बंद करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.