महाळुंगे इंगळे -ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या वतीने चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे विनापरवाना सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टया जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. प्लॅस्टिक साहित्यासह एकूण पाच लाखांचा कच्चा माल यावेळी ग्रामस्थांनी जाळून टाकला.
खेडचे आमदार दिलीप मोहिते, सरपंच विद्या सयाजीराजे मोहिते, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शेलपिंपळगाव ग्रामपंचायतीने ही धाडसी कारवाई केली. संपूर्ण देशात करोनाचा धुमाकूळ सुरु असताना चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव येथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. या ठिकाणाहून या भागातील बहुळ, चिंचोशी, मरकळ, सोळू, धानोरे, सिद्धेगव्हान, दौंडकरवाडी, शेलगाव, दत्तवाडी, आळंदी व चाकण आदी ठिकाणी येथून तयार करण्यात येणारी गावठी हातभट्टीची दारू नागरिकांना पुरविली जात होती.
स्थानिक नागरिकांकडून ग्रामपंचायतीला सुगावा लागला असता सरपंच मोहिते, ग्रामविकास अधिकारी उत्तम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे कर्मचारी राजेंद कोळी, कृष्णा दौंडकर, सुनील मोहिते, आशा कर्मचारी छाया इंगळे, शुभांगी इंगळे, दुर्गा दौंडकर, शीतल मोहिते, अनिता गाडे, शरद मोहिते, हिरामण पोतले, सयाजीराजे मोहिते आदींनी कारवाईत भाग घेतला.
ग्रामस्थांनी यावेळी जमिनीतील हातभट्टीचे लोखंडी बॅरल, प्लॅस्टिक ड्रम, कच्चा माल जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केला. कारवाईत तब्बल पाच लाख रुपये किमतीची गावठी दारू पेटवून देण्यात आली.