पिंपरी -राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील भरती उशिराने सुरू होणार आहे. जानेवारी अखेरीस ही भरती प्रक्रिया सुरु होणार असून शहर पोलीस दलातील 216 जागांसाठी तब्बल 15 हजार 147 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये दोन तृतीयपंथीयांचे देखील अर्ज आहेत.
सन 2019 साली जाहीर झालेल्या भरतीत 720 पदे भरण्यात आली होती. दरम्यान या भरती प्रक्रियेत झालेल्या कॉपी प्रकरणात 50 उमेदवारांची भरती स्थगित करण्यात आली. ते 50 उमेदवार आणि 166 नवीन अशी एकूण 216 पदांची भरती दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. आयुक्तालय स्थापनेच्या पाचव्या वर्षी पहिल्या टप्प्यातील भरती झालेले मनुष्यबळ प्रत्यक्ष आयुक्तालयाला मिळाले. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील भरती जाहीर झाली. आयुक्तालयाच्या स्थापनेवेळी ठरल्यानुसार पदे न भरता पहिल्या टप्प्यात 24 तर दुसऱ्या टप्प्यात 43 पदे कमी भरली आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत 216 पदांसाठी कला, विज्ञान तसेच वाणिज्य शाखेचे पदवीधारक, अभियंत्यांसह विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केले आहेत. या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा असलेली मैदानी चाचणी 30 जानेवारी पासून सुरु होणार आहे. त्याबाबत पोलीस आयुक्तालय प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. मागील वेळी पोलीस भरतीत थोडक्यात संधी चुकलेले उमेदवार यावेळी जोरात तयारी करीत आहेत. 216 पदांमध्ये 65 पदे महिलांसाठी राखीव आहेत.
पोलीस भरती जाहीर झाल्यानंतर तृतीयपंथीयांना देखील भरतीमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे जाहीर झालेली भरती स्थगित करून पुन्हा नव्याने भरतीचे आदेश काढण्यात आले. तृतीयपंथी देखील पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील भरतीसाठी दोन तृतीयपंथीयांनी देखील अर्ज केले आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी आयुक्तालयांतर्गत भरारी पथके तसेच दक्षता समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून भरती प्रक्रियेवर वॉच राहणार आहे. मैदानी चाचणी तसेच लेखी परिक्षेत काही गैरप्रकार होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे.
एकूण जागा – 216
प्राप्त अर्ज – 15147
महिलांसाठी
राखीव जागा-65