पिंपरी – करोना संशयितांना रुग्णालयात घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेसोबत पोलिसांनी फोटोसेशन केले. हा संतापजनक प्रकार भोसरीतील गव्हाणे वस्ती परिसरात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. १०) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची रुग्णवाहिका संशयित करोना बाधितांना नेण्यासाठी गव्हाणे वस्ती, भोसरी येथे आली होती. संशयित रुग्ण आणि त्याचे नातेवाईक रुग्णवाहिकेत बसल्यानंतर तेथे असलेल्या काही पोलिसांनी रुग्णवाहिका जवळ उभे राहून फोटोसेशन केले
सध्या करोना या साथीच्या आजाराबाबत नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. एकीकडे दिवस रात्र रस्त्यावर उभे राहून पोलीस करोनाचा प्रसार रोखण्यासाठी झटत आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी करोना संशयितांच्या रुग्णवाहिकेसोबत फोटोसेशन केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पाच पोलीस एकाच मोटारीत बसून गेल्याने सोशल डिस्टन्सिंगला पोलिसांनीच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.