बारामती – बारामती शहर व तालुका सीलबंद करण्यात आला असला तरी बारामतीकरांना प्रशासनाच्या मदतीने शेतकरी गट व शेतकऱ्यांच्या मार्फत भाजीपाला व मंडई घरपोच मिळणार आहे.
तालुक्यातील 44 शेतकरी गट व शेतकरी यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सकाळी सात ते दहा या वेळेत बारामती करांसाठी ही सेवा घरपोच मिळणार आहे.
बारामती शहरात श्रीरामनगर तसेच समर्थनगर येथे करोनाचे रुग्ण आढळले. यानंतर मुलांची वाढती संख्या पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार शहरात भीलवाडा पॅटर्न अवलंबण्यात येत आहे.
त्यानुसार बारामती शहर व तालुका सीलबंद करण्यात आला आहे. तरी नागरिकांना अत्यावश्यक व जीवनावश्यक सुविधा देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. बारामती शहरातील नागरिकांना मंडई तसेच भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकरी गट व शेतकऱ्यांमार्फत घरपोच भाजीपाला व मंडई देण्यात येणार आहे.
यासाठी तालुक्यातील 44 शेतकरी गट शेतकऱ्यांचे यादी तयार करण्यात आली आहे. प्रांताधिकारी यांच्या सूचनेनुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
यादीमध्ये शेतकरी गट व शेतकऱ्यांचे नाव तसेच कोणता शेतकरी गट व शेतकरी कोणत्या परिसरात मंडई व भाजीपाला घरपोच देणार याबाबतची माहिती तसेच शेतकरी गट व शेतकऱ्यांची मोबाइल क्रमांक प्रसिद्ध केले आहेत.
सकाळी सात ते दहा यावेळेत भाजी मंडई घरपोच उपलब्ध होणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये आपल्या परिसरासाठी कोणता शेतकरी गट अथवा शेतकरी आहे. ते पाहून नागरिकांनी त्यांना संपर्क साधावा, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केली आहे.