पुणे – महापालिकेकडून केंद्र शासनाच्या जननी शिशू योजने अंतर्गत आता महापालिका रूग्णालयात प्रसूती झालेल्या मातांच्या आरोग्यासाठी त्यांना मोफत आहार दिला जाणार आहे. प्रसूतीनंतरच्या सात दिवसांसाठी डायट प्लॅन अंतर्गत हा आहार दिला जाणार आहे. या शिवाय, या पुढे मातांना अॅम्ब्युलन्समधून त्यांच्या घरी नेऊन देखील सोडले जाणार आहे.
महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात पालिकेच्या आठ रुग्णालयात ही सुविधा असणार असल्याचे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डाॅ. वैशाली जाधव यांनी दिली.
या मिळणार सुविधा
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाचे चार प्रमुख घटक आहेत. यामध्ये मोफत आहार, महिलांना घरी नेऊन सोडणे, औषधे आणि त्यांच्या विविध तपासण्या करणे, यांचा समावेश आहे. महापालिकेच्या वतीने फक्त औषधे आणि तपासण्या केल्या जात होत्या. मात्र, आता आहार आणि घरी सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. महिलांना देण्यात येणार्या डायट प्लॅनसाठीच्या आहारासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून यासाठी वर्षभरासाठी १ कोटी ११ लाख रुपये खर्च होणार आहे.
यामध्ये मातांना दोन वेळा चहा, एक वेळ नाष्टा आणि दोन वेळा जेवण देण्यात येणार आहे. संबंधित मातेची प्रसूती ही नॉर्मल असेल तर तिला तीन दिवस आहार दिला जाणार आहे आणि सीझर झाले असेल तर ७ दिवस आहार दिला जाणार आहे. दरम्यान महापालिकेच्या सर्वच प्रसूती गृहामध्ये ही सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या दवाखान्यात मिळणार सुविधा
१. कमला नेहरू रुग्णालय
२. कै मातोश्री रमाबाई आंबडेकर प्रसूतिगृह
३. डॉ दळवी रुग्णालय
४. कै चंदूमामा सोनावणे प्रसूतिगृह
५.भारतरत्न स्व राजीव गांधी रुग्णालय
६. कै सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह
७. कै मालती काची प्रसूतिगृह
८. राजमाता जिजाऊ प्रसूतिगृह