पुणे – विसर्जन मिरवणुकीत संशयित व्यक्ती किंवा बेवारस वस्तू आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्षात किंवा बंदोबस्तावरील पोलिसांना त्वरीत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (दि. 29) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे.
लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरुन मिरवणूक जाणार आहे. मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहर तसेच उपनगरांत सुमारे नऊ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळपासून शहरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत शहर तसेच उपनगरांत पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.
साध्या वेशातील पोलिसांची गस्त
राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत. विसर्जन मार्गावरील दागिने, मोबाइल संच हिसकावणे तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी गर्दीत साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारीक नजर राहणार आहे.
रुग्णवाहिकेची सुविधा
शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.