शेवगाव -येथील बोधेगाव रस्त्यावरील ग्रामीण आरोग्य केंद्राजवळ बुधवारी रात्री एका पोलिसांवरच हल्ला करुन त्यास मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याने हा प्रकार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
शेवगाव पोलीस ठाण्यातर्गंत बोधेगाव दूरक्षेत्रात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी उमेश अर्जुन गायकवाड हे बुधवारी रात्री 7.30 च्या सुमारास शेवगाव- बोधेगाव रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दुचाकीहून चालले असता फोन आल्याने ते दुचाकी उभी करून मोबाईलवर बोलत होते. यावेळी चार युवकांनी आमच्याजवळ दुचाकी का उभी केली, अशी विचारणा करीत त्यांना लाथाबुक्याने मारहाण करुन गाडीची मोडतोड केली. गायकवाड यांनी त्या युवकांच्या तावडीतुन सुटका करून घेत शेवगाव पोलीस ठाणे गाठले. घडलेली माहिती सहकाऱ्यांना सांगितली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे यांच्यासह इतर सात आठ कर्मचाऱ्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली.यावेळी पोलिसांनी कुमार शशिकांत मगर, मनोज अशोक मगर व भाऊसाहेब गंगाधर मिसाळ या तिघांना ताब्यात घेतले. तर राहूल शेषराव मगर हा पोलिसांना पाहून पसार झाला.
या रस्त्यावर याच ठिकाणी अनेकदा लुटमार झालेली आहे. आरोपीतही ताब्यात आहेत. अशावेळी आपल्याच कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा गांभीर्याने तपास करुन गुन्हा दाखल करण्याचे सोडून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या मारहाणीची सखोल चौकशी करुन दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस कर्मचाऱ्यांसह शहरातील ग्रामस्थांनी केली आहे.
मागील आठवड्यातील बुधवारीच दादासाहेब पोटभरे या होमगार्ड कर्मचाऱ्यास मारहाण केल्या प्रकरणी भाजी विक्रत्यांसह तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.