नगर -छत्रपती शाहू महाराजांची 98 वी पुण्यतिथी लॉकडाऊनच्या काळात घरात राहूनच स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलव्दारे मान्यवरांना एकत्र आणून डिजीटल पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी व्हिडिओ ऍपच्या माध्यमातून अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे महानगराध्यक्ष अभिजीत वाघ तर प्रमुख अतिथी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे राहुल झावरे, नगरसेविका शोभाताई बोरकर, रचना कला महाविद्यालयाचे संचालक प्रशांत शेकटकर सहभागी झाले होते.
अभिजीत वाघ म्हणाले की, आज जगाबरोबर भारतातही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. यापूर्वी अशाच एका रोगानं जगाला वेठीस धरलं होतं. संपूर्ण जगात 1898-99 दरम्यान प्लेगची वा-याच्या वेगाने साथ पसरत गेली. एकट्या मुंबईत प्लेगमुळे 9 लाख लोक मृत्युमुखी पडले असल्याची वृत्त येताच संकटावेळी राज्यकर्त्यांनी जनतेची काळजी कशी घ्यावी याचा आदर्शच शाहू महाराजांनी समोर ठेवला. देशातील पहिले सार्वजनिक होमिओपॅथी रुग्णालय कोल्हापुरात सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विकास होळकर, वाहेद शेख, ऋषिकेश दुसंग, आसिफ शेख, साक्षी मुनोत, श्रीराम कुलकर्णी, अमिन पठाण, सचिन सापते हे व्हिडिओ ऍपच्या साहाय्याने सहभागी होते.