सातारा(प्रतिनिधी) – सार्वजनिक ठिकाणी दुचाकी रस्त्यावर लावून गोंधळ घालणाऱ्या दुचाकीस्वाराला अडविल्यामुळे संबंधित दुचाकीस्वाराने पोलिसालाच धक्काबुक्की केली. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याचा शर्ट फाटला असून याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनायक रामचंद्र शेडगे (रा. चिपळूणकर बाग, मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार पेठ ते राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर विनायक शेडगे हा दुचाकी उभी करून गोंधळ घालत होता. यावेळी हवालदार संतोष त्रिंबके यांनी तू गोंधळ न घालता बाजूला ये, असे सांगितले असता मी बाजूला जाणार नाही, असे शेडगे याने त्यांना सांगितले. एवढ्यावरच न थांबता “तुझा काय संबंध,’ अस म्हणत हवालदार संतोष त्रिंबके यांच्या शर्टची कॉलर पकडत त्यांच्याशी झटापट केली. या झटापटीत त्रिंबके यांचा शर्ट फाटला. या प्रकारानंतर त्रिंबके यांनी तत्काळ शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन विनायक शेडगे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.