मोरगाव, (वार्ताहर) – मोरगाव (ता . बारामती) येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिरामध्ये आज (मंगळवार, दि. १३) पहाटे पाच वाजता गुरव मंडळींच्या हस्ते पूजा झाल्यानंतर भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. माघ यात्रोत्सवाचा आजचा चौथा दिवस असून, द्वार यात्रेची सांगता व गणेश जयंतीने करण्यात आली. राज्यातील कानाकोपऱ्यातून सुमारे पन्नास हजार भाविक मयुरेश्वर दर्शनासाठी आले होते.
अष्टविनायकातील पहिले तीर्थक्षेत्र म्हणून मोरगाव (ता. बारामती) येथील मयुरेश्वराला मान आहे. माघी यात्रोत्सव शनिवारी ( दि. १० फेब्रुवारी) सुरु झाला आहे. या यात्रेच्या निमित्ताने सर्व धर्मीयांना माघ शुद्ध प्रतीपदा ते माघ शुद्ध पंचमी या काळात मयुरेश्वराच्या मुख्य गाभाऱ्यात जाऊन श्रींची स्वहस्ते पूजा व जलाभिषेक करता येतो.
सोमवारी (दि.१२ फेब्रुवारी) माघी यात्रोत्सवाच्या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य पट्टाधिकारी मंदार देव महाराज चिंचवड येथून मोरया गोसावी प्राप्त मंगमूर्तीची स्वारी घेऊन रात्री सात वाजता आले. यावेळी विश्वस्त व ग्रामस्थांनी मंगलमूर्तीचे स्वागत केले. मंगलमूर्तीची स्वारी मंदिरात गेल्यानंतर मंगलमूर्ती व मयुरेश्वर देवता यांचा भेट सोहळा झाला. त्यानंतर आरती, नैवद्य असे विविध धार्मिक विधी झाले. आज गणेश जयंती निमित्ताने पहाटे पाच वाजता गुरव मंडळींची प्रक्षाळ पुजा झाल्यानंतर भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी मुख्य दरवाजा खुला करण्यात आला .
ऱाज्यभरातील भाविकांची दिवसभर गर्दी होती. आज गणेश जयंतीनिमित्ताने महपूजा, नैवद्य, तर रात्री १० वाजता श्रींचा पालखी छबिना, खिरापत वाटप करण्यात आले. श्रींना शेंदुर लेपन (शेंदुरपुडा) झाल्यानंतर रात्रभर श्रीमन् महासाधू मोरया गोसावी पदे, आरती असे कार्यक्रम झाले.