थेट पोलीस ठाण्यातून चालणार कारभार; खबरदारीचा उपाय म्हणून घेतला निर्णय
पुणे – शहरातील करोना हॉटस्पॉट क्षेत्रात असलेल्या पोलीस चौक्यांतील कामकाज बंद करून थेट पोलीस ठाण्यातून सुरू ठेवण्यात आले आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहराच्या मध्यवस्तीत दिवसेंदिवस मोठ्या संख्येने करोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने हा सर्व परिसर अतिसंक्रमित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या भागात असलेल्या पोलीस चौक्यांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या कमी असते. तसेच, एखादी घटना घडली, तर त्याचा परिणाम या चौक्यांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरुपात या पोलीस चौक्यांचे काम बंद करण्यात आले आहे.
याविषयी सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले, “अतिसंक्रमित क्षेत्रात असलेल्या पोलीस ठाण्यामधील कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर नियमानुसार त्यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या पोलीस ठाण्याच्या परिसरात भवानी पेठेसारखा अतिसंक्रमित भाग येत असल्याने तेथे आवश्यकतेनुसार अधिक मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले आहे आणि पोलीस चौक्यांचे काम बंद ठेवण्यात आले असून त्यांचे कामकाज थेट पोलीस ठाण्यातून करण्यात येत आहे.’