वाहनचालकांवरील कारवाईत पोलीस दंग

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध धंद्यांकडे मात्र दुर्लक्ष

सोमेश्वरनगर – बारामती तालुक्‍यातील वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्या अंतर्गत असणाऱ्या ग्रामीण भागातील गावांमध्ये जाऊन वाहतूक पोलीस करवाई करीत आहेत. परंतु, गाव परिसरातील अवैध धंद्यावर कारवाई करायचे सोडून वाहन चालकांना पोलीस टार्गेट करीत असल्याने वाणेवाडी, करंजेपूल, करंजे, वाघळवाडी, चौधरवाडी येथील वाहन चालक त्रस्त आहेत.

करंजेपूल येथील मुख्य चौकात मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा थाबून वाहनांवर कारवाई केली जात आहे. करंजेपुल पोलीस चौकी समोरून चार दिवसांपूर्वी एका महिलेचे मंगळसूत्र दिवसा चोरीला गेले तर मागील महिन्यातही काही हौशी युवकांनी भररस्त्यात केक कापून वाढदिवस साजरे केले तसेच येथील शिक्षण संस्थांत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना रोड रोमियांचा त्रास होत आहे. गुटख्यावर बंदी असताना किराणा दुकानं, टपरीवर सर्रास विक्री होत आहे. यासह सोमेश्वर परिसरात देशी दारू विनापरवाना विक्री सुरू आहे, असे बेकायदा धंदे असताना याकडे दुर्लक्ष करून पोलीस मात्र वाहनचालकांवर कारवाई करण्यात दंग आहेत.

वाहन चालकांवर होणारी कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांतर्गत होत असून, दर गुरुवारी ही विशेष मोहीम ठाण्याअंतर्गत असणाऱ्या 62 गावांतील सार्वजनिक रस्त्यांवर केली जात आहे. वाहन अपघाताचे प्रमाण वाढले आहे ते कमी करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे.
– सोमनाथ लांडे, प्रभारी पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×