#video: काश्‍मीरची परिस्थिती सांगताना महिलेला अश्रु अनावर

श्रीनगर : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे काही नेता शनिवारी जम्मू-काश्‍मीरच्या दौऱ्यावर गेले होते. परंतु, कायदा आणि सुविधेचा प्रश्‍न समोर करत त्यांना विमानतळावरूनच माघारी पाठवण्यात आले. यादरम्यान विमानातील प्रवासादरम्यानच एका काश्‍मिरी महिलेने राहुल गांधींसमोर काश्‍मीरची परिस्थिती सांगितली. यावेळी बोलताना त्या महिलेला आपले अश्रु अनावर झाल्याचे पहायला मिळाले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कॉंग्रेस प्रवक्ता राधिका खेरे यांनीही हा व्हिडिओ ट्‌विट केला असून त्यासोबत कश्‍मीर का दर्द सुनिए.. अशी भावनिक पोस्ट केली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला राहुल गांधींसमोर काश्‍मीरची परिस्थिती आणि समस्या कथन करताना दिसत आहे. आम्ही खूप त्रस्त आहोत असे ही महिला या व्हिडिओमध्ये वारंवार सांगताना दिसत आहे. शिक्षण घेणाऱ्या छोट्या छोट्या मुलांचेही घरातून बाहेर पडणे कठीण झाले… एकमेकांना शोधायला ते जातात तर त्यांनाही पकडल जाते…एका भावाला हृदयाचा त्रास आहे, पण 10 दिवसांपासून त्यांनाही डॉक्‍टरांकडे तपासणीसाठी घेऊन जाता येत नाही…आम्ही खूप त्रस्त आहोत, अशा शब्दांमध्ये आपली कैफियत मांडताना या महिलेला रडू कोसळले. यानंतर तेथे उपस्थित काही महिला पत्रकार आणि इतर प्रवासी या महिलेचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

अखेरीस तिचे सगळं बोलणं ऐकून घेतल्यावर राहुल देखील या महिलेचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×