मराठीतल्या बालकुमार साहित्यिक, कवयित्री लीलावती भागवत यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर, 1920 रोजी रोहा येथे झाला. त्यांचे माहेरचे आडनाव पोतदार. लहानपणीच त्यांच्यावर शिक्षक असलेले मामा, तात्या क्षीरसागर यांनी संस्कार केले होते. लीलावतींचे शिक्षण महर्षी कर्वे यांच्या कन्याशाळेत झाले. नंतर एसएनडीटी विद्यापीठातून पदवी प्राप्त झाल्यावर त्यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केलं.
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रामध्ये “वनिता मंडळ’ हा कार्यक्रमही त्यांनी प्रस्तुत केला. या कार्यक्रमातून महाराष्ट्रातल्या अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख त्यांनी लोकांना करून दिली. या कार्यक्रमातून त्यांनी अनेक नवोदित लेखिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमांतर्गत आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यातूनच वसुमती धुरू या पुढे मराठीतील पाकशास्त्राच्या नामवंत लेखिका म्हणून पुढे आल्या. वर्ष 1940 मधे त्यांचा विवाह फास्टर फेणेचे जनक प्रसिद्ध बालसाहित्यिक भास्कर रामचंद्र भागवत यांच्याशी झाला. भास्कर व लीला या दांपत्याने आयुष्यभर विपुल लेखन केले.
लीलावती भागवतांनी आपल्या कथा व कविता यातून विपुल बालसाहित्यनिर्मिती केली. “भाराभार गवत’ या नावानं त्यांनी पती भा. रा. भागवत यांच्या निवडक साहित्याचं संपादन केलं. वर्ष 1951 मध्ये या दांपत्याने केवळ बालचमूसाठी “बालमित्र’ या नावाने मासिक चालू केले. त्या काळात मुलांसाठी विशेष मासिके नव्हती. हे मासिक सुरू केले त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 350 रुपये होते. वेळ आल्यास दागिने मोडू, परंतु मुलांसाठीचा हा उपक्रम चालू ठेवू, असा निर्धार लीलाताईंनी दाखविला. तेव्हा पालकांची मुलांसाठी मासिके विकत घेण्याची तयारी नसायची.
मासिकातील माहितीबरोबर मुलांना आकर्षक वाटावी अशी द. ग. गोडसे यांची चित्रे असायची. त्यामुळे “बालमित्र’ खरोखरीच मुलांचा बालमित्र झालं. मात्र आर्थिक नुकसान वाढत गेल्याने नाईलाजाने ते मासिक बंद करावे लागले. बालसाहित्यकार अमरेंद्र गाडगीळ यांनी बालसाहित्य संस्थात्मक पद्धतीतून करण्याची कल्पना या दांपत्यापुढे मांडली आणि त्यातूनच अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेची स्थापना झाली. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या उभारणीत लीलावती भागवतांचे मोठे योगदान आहे. त्यांनी केलेल्या बालसाहित्यामध्ये मुलांना आवडतील व त्यातून मुलांवर चागले संस्कार होतील अशी सुमारे 25 पुस्तके आहेत. यात वाट वळणाची, चिट्टू पिट्टूचा पराक्रम, आला विदूषक आला, जगाला प्रेम अर्पावे, स्वर्गाची सहल, रानातील रात्र, प्रेमचंद कथा, इंजिन हे छोटे, खेळू होडी होडी, कुड कुड थंडी, रघू रघू राणा, कोणे एके काळी, स्वर्गाची सहल इत्यादी आहेत.
“चिऊताई, चिऊताई! काय रे चिमणा? हा बघ आणलाय मोत्याचा दाणा! छान आहे बाई, पण ठेवायचा कुठं? त्यात काय मोठं, बांधू या घरटं!’ अशा कवितेमधून बालचमूला कवितेची गोडी लावली. त्यांच्या अखेरच्या आयुष्यात त्यांचे “मुलांसाठी दासबोध’ हे पुस्तक प्रकाशित झाले. वयाच्या 93 व्या वर्षी 25 नोव्हेंबर 2013 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.