पुणे :– स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित दुसऱ्या (Sports Field U 14 Monsoon League) स्पोर्टसफिल्ड मान्सून लीग अजिंक्यपद 14 वर्षाखालील 30-30 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अकादमी संघाने आर्यन्स् क्रिकेट अकादमीचा 30 धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. या सामन्यात क्रिकेट नेक्स्ट अकादमीने 244 धावांचा डोंगर उभा केला.
आदित्य जाधव याने 42 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकारांसह नाबाद 88 धावांची खेळी केली. शौर्य देशमुख याने 68 धावांची तर, देवाशिष घोडके याने 40 धावांची खेळी केली. शौर्य आणि देवाशिष या दोघांनी 171 चेंडूत 127 धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या आव्हानाला उत्तर देताना आर्यन्स् क्रिकेट अकादमीचा डाव 214 धावांवर मर्यादित राहीला.
आर्यन्स्कडून अर्णव पाटील याने 65 धावांची तर, आयुष गोसावी याने 58 धावांची खेळी केली. शौर्य देशमुख याने 36 धावात 3 गडी टिपत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पोर्टसफिल्डचे अमित काळे, क्रिकेट नेक्स्ट अकादमीचे संचालक विक्रम देशमुख आणि स्टेडियम क्रिकेट क्लबचे संचालक भरत मारवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे संचालक सनी मारवाडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.