पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडची अधिसूचना राज्य शासनाकडून नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. खेड, हवेली, मावळ आणि मुळशी या चार तालुक्यांतील 44 गावांमधून हा रिंगरोड जाणार असून रिंगरोडसाठी सुमारे 720 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. भूसंपादन करताना काही जागा या नगर रचना योजनेच्या माध्यमातून तर काही जागा या टीडीआर, एफएसआय अथवा रोख रकम देऊन ताब्यात घेण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू आहे.
पीएमआरडीएने हाती घेतलेला हा रिंगरोड सुमारे 85 किलोमीटर लांबीचा आणि 65 मीटर रुंदीचा असणार आहे. हे काम टप्प्याने होणार आहे. एमएसआरडीसीने हाती घेतलेल्या रिंगरोड हा सोलू या गावापर्यंत येत आहे. त्या ठिकाणी पीएमआरडीएचा रिंगरोड त्यास येऊन मिळणार आहे. त्यामुळे आळंदी ते नगर रोडवरील वाघोलीपर्यंत सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीच्या रिंगरोडची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया यापूर्वी प्राधिकरणाने हाती घेतली आहे. त्यासाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे.
पीएमआरडीएने विकास आराखड्यात रिंगरोडच्या बाजूने नगर रचना योजना (टीपी स्कीम) प्रस्तावित केल्या आहेत. त्यापैकी पाच नगर रचना राज्य सरकारकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यामधून रिंगरोडसाठी सुमारे साडेसहा किलोमीटर जागा मोफत पीएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे. नगर रचना योजनेच्या माध्यमातून रिंगरोडसाठी जे क्षेत्र ताब्यात येणार नाही, त्या भागात थेट खरेदी अथवा टीडीआरच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.