पुणे – पुणे महानगर नियोजन समितीवर 30 सदस्यांची निवड ही निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. यासाठीची प्रारुप मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. या निवडणुकीमध्ये “पीएमआरडीए’च्या हद्दितील ग्रामीण भाग (जिल्हा परिषद), लहान नागरी क्षेत्र (नगर परिषद) आणि मोठे नागरी क्षेत्र (महानगरपालिका) गटातून एकूण 980 मतदार आहेत. या मतदार यादीबाबत काही आक्षेप, उणीवा किंवा चुका असल्यास यासंदर्भात हरकती दि. 20 ऑगस्ट 2021 पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करता येणार आहे.
राज्य शासनाने महानगर नियोजन समितीची निवडणूक घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी राव यांनी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. यामध्ये मतदार यादी तयार करून ती प्रसिद्ध केली आहे. महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये “पीएमआरडीए’च्या हद्दितील मोठ्या क्षेत्रामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा समावेश होत असून यामध्ये दोन्ही महापालिकेतील नगरसेवकांचा मतदार यादीत समावेश आहे. तर, लहान नागरी क्षेत्रात शिरुर, सासवड, लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी या नगरपरिषदांचा समावेश होत आहे. या नगरपरिषदांमधील नगरसेवकांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहे. तर, ग्रामीण क्षेत्रात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती आणि पीएमआरडीएच्या हद्दितील गावांमधील सरपंच यांचा समावेश होतो.
पुणे महानगर नियोजन समिती निवडणूक-2021ची प्रारुप मतदार यादी www.divcommpune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मतदार यादीसंदर्भात हरकत असल्यास विभागीय आयुक्त कार्यालयात लेखी स्वरुपात अथवा pmpcelection2021@gmail.com या ई-मेलवर दाखल करता येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राव यांनी दिली आहे.
दोन नगरपरिषदांचा मतदार यादीत समावेश नाही
पीएमआरडीएच्या हद्दित चाकण व राजगुरुनगर या नगरपरिषदांचा समावेश होतो. या दोन्ही नगरपरिषदांची मुदत संपली असून त्यांची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही नगरपरिषदांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही नगरपरिषदांमध्ये नगरसेवक नसल्याने मतदार यादीत यांचा समावेश नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.