पुणे – समाजाच्या उभारणीत ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान आहे. विदेशात त्यांचा मोठा सन्मान केला जातो आणि भारतीय संस्कृतीत तर ज्येष्ठांच्या सन्मानाची परंपरा आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं, त्यांना गरजेच्या वेळेस मदत उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.
पाटील यांच्या पुढाकारातून बाणेरमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी “डॉक्टर आपल्या घरी’ उपक्रम सुरू करण्यात आला. याअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार दिले जाणार आहेत. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष मधुकर पवार, पुणे शहर भाजप उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, डॉ. बोरुडे उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आजच्या गतीमान जीवनपद्धतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सेवा हेच संघटन’ हा मंत्र दिला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम राबविण्यावर भर द्यावा. कुटुंबातील कर्ता व्यक्ती कामानिमित्त परगावी असेल, तर ज्येष्ठांच्या काळजीसाठी एखादे सेंटर सुरू करावे. तसेच विरंगुळा केंद्रासोबतच शहराजवळच एखादे गेस्ट हाऊस उभारुन, ज्येष्ठांनाही निसर्गाचा आनंद मिळावा, यासाठीची सुविधा करावी. अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठांच्या देखभालीची व्यवस्था आदी उपक्रम सुरू केले पाहिजेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर पवार म्हणाले, “फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ज्येष्ठ नागरिक क्लिनिकमध्ये जाऊन उपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे डॉक्टर आपल्या घरी अशा उपक्रमाचा ज्येष्ठ नागरिकांना नक्की फायदा होईल, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक डॉ. संदीप बुटाला, सूत्रसंचालन पुनित जोशी, तर आभार उमा गाडगीळ यांनी केले.