पिंपरी -दैनंदिन जीवनामध्ये इंधन दरवाढ, वाहतूककोंडी आणि प्रदूषण यावर सार्वजनिक वाहतूक चांगला पर्याय आहे. याबाबतच जनजागृती करण्यासाठी पीएमपीएमएलने अनोखा उफक्रम राबवला आहे. फिरते प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आलेल्या फिरत्या प्रदर्शनाचे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी सहाय्यक आयुक्त वामन नेमाने, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, विलास साळवी तसेच पीएमपीएमएलचे कर्मचारी विकास सुतार, महेश बिराजदार, ओंकार चितळे आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनात पीएमपीएमएलचा आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला असून बसचे अनेक मॉडेल्स ठेवण्यात आले आहेत. तसेच बसमधील प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी सर्व सोयीसुविधा बसमध्ये करण्यात आली असून त्याबद्दलची माहिती याठिकाणी नागरिकांना देण्यात येत आहे. इंधनाला पर्याय म्हणून ई-बस सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत. नागरिकांना अल्प दरात बसचा प्रवास करता यावा यासाठी विविध पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
त्यात शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, मनपा हद्दीतील प्रवास, दैनंदिन पास अशा निकषानुसार पासची व्यवस्था करण्यात आली आहे.
फिरते प्रदर्शन नागरिकांनी पाहावे आणि सार्वजनिक वाहतुकीचे फायदे याबद्दल माहिती घेऊन शहर पर्यावरणपूरक बनविण्यात योगदान द्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.