पुणे – नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 14 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील दुसऱ्या पीएमडीटीए केपीआयटी लिटल कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2021 स्पर्धेत मुलींच्या गटात अहाना कौर, तर मुलांच्या गटात अभिराम निलाखे याने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
मेट्रोसिटी स्पोर्टस क्लब, कोथरूड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित अहाना कौरने श्रावणी देशमुखचा टायब्रेकमध्ये 5-4(4), 4-2 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. अहाना ही दिल्ली पब्लिक शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून मेट्रोसिटी स्पोर्टस क्लब येथे प्रशिक्षक नवनाथ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित अभिराम निलाखेने अव्वल मानांकित अद्विक नाटेकरचा 4-2, 5-3 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. अभिराम हा बाळकृष्ण मंदिर येथे सातवी इयत्तेत शिकत असून पार्थ चिवटे टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक पार्थ चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे या वर्षातील या गटातील पहिलेच विजेतेपद आहे.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मेट्रोसिटी स्पोर्टस अँड हेल्थ क्लबचे संचालक शितल ओस्वाल, सौरभ जोशी आणि बाबासाहेब कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे व स्पर्धा निरीक्षक अनुप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
14 वर्षांखालील मुले : उपांत्य फेरी :
अद्विक नाटेकर(1) वि.वि.देव तुराकिया(4)7-1; अभिराम निलाखे(2) वि.वि.अर्जुन किर्तने(8) 7-5;
अंतिम फेरी : अभिराम निलाखे(2) वि.वि.अद्विक नाटेकर(1) 4-2, 5-3.
14 वर्षांखालील मुली : उपांत्य फेरी :
अहाना कौर(1) वि.वि.देतिया जैन 7-1; श्रावणी देशमुख वि.वि.अंजली निंबाळकर 7-2;
अंतिम फेरी: अहाना कौर(1) वि.वि. श्रावणी देशमुख 5-4(4), 4-2.