पुणे, दि. 27 –मोठा गाजावाजा करत विधानसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन करण्यात आलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणात गेल्या तीन वर्षांपासून भूसंपदानाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अस्तित्वातील 32 मीटर रुंदीचा हा रस्ता 84 मीटर रुंद आणि 4 किलोमीटर लांबीचा करण्यासाठी 815 कोटी रुपये भूसंपादन, तर 175 कोटी कामावर खर्च होणार होते. मात्र, भूसंपादनासाठी एवढा मोठा निधी महापालिकेकडे नसल्याने पालिकेने आता हा रस्ता 50 मीटर रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा सुधारित प्रस्ताव अखेर तयार करण्यात आला असून, या प्रस्तावानुसार आता भूंपादनासाठी 277 कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यातही 200 कोटींचा निधी राज्य शासनाकडे विशेष बाब म्हणून मागण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेस भूसंपदानासाठी अवघा 77 कोटींचा खर्च येणार असून, रस्त्याच्या कामासाठी 100 कोटींच्या आसपास खर्च अपेक्षित आहे.
या रस्त्याचे काम महापालिकेने 2019 मध्ये सुरू केले होते. विकास आराखड्यात हा रस्ता सुमारे 84 मीटर प्रस्तावित आहे. हा रस्ता 84 मीटर करण्यासाठी एकूण 2 लाख 88 हजार चौरस मीटर जागेची आवश्यकता होती. अस्तित्वातील रस्ता 58 हजार चौरस मीटर जागेवर होता. काम सुरू झाल्यानंतर पालिकेने 66 हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन केले. त्यानंतरही तब्बल 1 लाख 60 हजार चौरसमीटर जागा महापालिकेस ताब्यात घ्यायची होती. मात्र, जागा मालक रोख रकमेची मागणी करत असल्याने महापालिकेचा भूसंपादनाचा खर्च दरवर्षी बाजारभावाने वाढतच होता. परिणामी, महापालिकेने या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करून, सुरुवातीला वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेत अखेर हा रस्ता 50 मीटर रूंद करण्याचा निर्णय घेतला आहे.