पुणे, दि. 27 –सिंहगड रस्त्यावर बेकायदा सावकारी करणाऱ्या एका सराफाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात तक्रारदाराने साडेतीन लाख रुपयांची मूळ रक्कम व्याजासह परत केल्यानंतर सराफाने सात लाख रुपयांची मागणी केली होती.
या प्रकरणी सराफ व्यावसायिक प्रशांत सुरेश तोलगेकर (रा. विठ्ठल रुक्मिणी सोसायटी, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत एकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दिला होता. तक्रारदाराने तोलगेकरकडून साडेतीन लाख रुपये व्याजाने घेतले होते.
तक्रारदाराची मोटार तसेच सदनिकेची कागदपत्रे तोलगेकरने गहाण ठेवली. त्यानंतर तक्रारदाराने तोलगेकरला मूळ मुद्दल तसेच व्याजापोटी साडेतीन लाख रुपये दिले.
पैसे परत केल्यानंतर सराफाने तक्रारदाराकडे सात लाख रुपयांची मागणी केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.